सामाजिक संस्था - प्रथम
’प्रत्येक मूल शाळेत’ हे ’प्रथम’चं ब्रीदवाक्य आहे. १९९४ मध्ये UNISES च्या पुढाकाराने प्रथमची स्थापना झाली. प्रथमच्या स्थापनेपूर्वी माधव चव्हाण हे प्रौढ साक्षरता प्रसाराचं काम करीत होते. प्राथमिक शिक्षणाचा सर्वदूर प्रसार करण्यासाठी लहान-मोठ्या उद्योजकांना व व्यावसायिकांनाही या कार्यात सहभागी करून घेतलं पाहिजे, इतकच नव्हे तर स्थानिक स्वराज्य संस्था, शैक्षणिक व सामाजिक संस्था, पालक, वस्तीतले लोक या सगळ्यांचं सहकार्य घेतलं पाहिजे, अशी माधवरावांची भूमिका होती.
प्रथम आणि इतर NGO's किंवा अन्य सामाजिक संस्था यांच्यात मुलभूत फरक आहे.
प्रथमचं सगळं कार्य कॉर्पोरेट शिस्तीत चालतं. काही NGO's परदेशी आणि स्थानिक धनदांडग्यांकडून फंड गोळा करतात आणि सामाजिक कार्याचा देखावा निर्माण करतात, तर काही सामाजिक संस्था पुरेशा निधीअभावी कामाचा डोंगर उभा करण्यात अपयशी ठरतात. काही सामाजिक संस्था मंत्र्यांनी आणि आमदारांनी आपल्या हितसंबंधासाठी वाढवलेल्या असतात तर काही संस्थांमध्ये कमालीचा बेशिस्तपणा आणि नियोजनाचा दुरदृष्टीचा अभाव असतो.
या पार्श्वभूमीवर प्रथमचं कार्य वाखाणण्याजोगे आहे. प्रथमच्या कामाचा व्याप भारतातील १८ राज्यांत विस्तारलेला आहे. आसाम, मणिपूर सारख्या दुर्लक्षित आणि समस्याग्रस्त भागातही त्यांनी उत्तम नेटवर्क उभं केलं आहे.
युनिसेस, बिल गेटस फाऊंडेशन आणि अशा अनेक देशी-विदेशी कॉर्पोरेशसकडून त्यांना मोठ्या प्रमाणावर निधी मिळतो.
या निधीचा योग्य आणि कार्यक्षम वापर करण्यावर आणि चोख हिशेब ठेवण्यावर संचालक मंडळाचा आणि खुद्द माधवरावांचा कटाक्ष असतो. आणि म्हणूनच कोणाकडून किती निधी घ्यायचा, कोणतीही फाजिल बंधनं - जी संस्थेच्या उद्दिष्टांशी आणि कार्याच्या नितीमत्तेशी फारकत घेणारी असतील. अशी कोणतीही बंधनं स्वीकारली जात नाहीत. प्रसंगी निधी नाकारण्याचं नम्र धाडस केलं जातं.
मागच्याच आठवड्यात प्रथमला IBN/CNN चा प्रतिष्ठीत पुरस्कार मिळाला. तोही माननिय पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या हस्ते.
ह्या पुरस्कारासाठी अण्णा हजारे व त्यांच्यासारख्या मोठ्या मान्यवार व्यक्तींचा व संस्थांचंही नामांकन झालं होत. परंतु या सगळ्यांमधून या पुरस्कारासाठी ’प्रथम’च्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला.


