अवघे पाऊणशे वयमान...
वयाची पंचाहत्तरी झाली गात्रं थकली. निवृत्तीनंतरचं आयुष्य म्हणजे जीवनाची संध्याकाळ... अशी वाक्यं आता कालबाह्य झालीच आहेत.. सध्याच्या काळात माणसाची वयोवृध्द अवस्था फार उशीरा सुरु होते. निवृत्तीनंतर छंद जोपासयाची उमेदही फार! आयुष्यभर जे करायला वेळ मिळालं नाही ते करायचं ठरवळेलं असतं. अगदी पेटीवादन, संगीत, बॅडमिंटन, वाचन... अनेकानेक छंद! पण ट्रेकिंग-गिर्यारोहण...? कैलास मानस सरोवर परिक्रमा... ? कसं वाटतं वाचायला? असंख्य चढउतार - चढाव.
बांद्रा-पूर्व-मुंबई येथे राहणारे निवृत्त राजशिष्टाचार अधिकारी श्री. मधुकर फाटक! नुकतीच त्यांनी वयाची पंचाहत्तरी पार केली. निवृत्तीनंतर ट्रेकिंगची आवड जोपासणाऱ्या अप्पांशी मारलेल्या या गप्पा :
नमस्कार अप्पा! काय म्हणतात डोंगरदऱ्या?
नमस्कार, नमस्कार! डोंगरदऱ्या काय म्हणतात ते त्यांच्यापर्यंत जाऊनच विचारावं लागत.
हो ना! तुम्ही त्यांच्यापर्यंत जाऊन आल्यावर आम्ही तुमच्यापर्यंत पोहचलो की खुप झालं. कसं काय जमवता तुम्ही हे सारं?
मला भटकंतीची आवड पहिल्यापासूनच होती. तिचं ट्रेकिंगमध्ये पद्धतशीर रुपांतर मात्र निवृत्तीनंतर केलं. पहिली यात्रा केली ती छोटा कैलास ९३ साली. जीव धन्य झाला. त्रास वैगेरे तर मला काहीही झाला नाही. उलट पुढच्या वेळी पत्नीला घेऊन जाण्याचं मी निश्चित केलंं. तीनेही ते सुख अनुभवावं असं मनात आलं.
कैलास मानसरोवर... त्यासाठी निवड चाचणी असते? वयाची अट असते? वैद्यकिय चाचण्या?
वयाची अट नसते. मात्र मेडीकली आपण फिट असावचं लागतं. छोटा कैलास नि बडा कैलास! गुंजी पर्यंत दोन्हीचा रस्ता कॉमन असतो. नंतर रुट बदलतात. मी छोटा कैलास दोन वेळा केलं. ९३ साली नी ९४ साली, दुसऱ्यांदा मी ग्रुप लिडर होतो. छोटा कैलास ओम पर्वताचं दर्शन घडलं.
मुळात आम्हाला कैलास मानस परिक्रमेची अधिक माहिती द्या
भारताच्या उत्तरेला तिबेटचा जो भाग आहे तिथे चायना हद्दीत ’लिपोपास’ला आपण उतरतो. यात्रेकरूंना न्यायला तिथे कार्स असतात. सामान पोत्यांमध्ये बांधलेलं असतं. प्रत्येकाला २५ किलो सरासरी सामान न्यायला परवानगी असते. येणाऱ्या जाणाऱ्या यात्रेकरूंमध्ये तीन बॅचेसचं अंतर असतं. पुढचा सगळा प्रवास निसर्गाच्या अधिक सन्निध नेणारा असतो. ’कैलास परिक्रमा’ नि ’मानस परिक्रमा’ करणाऱ्यांचं वर्गिकरण केलं जातं. आय.ए.एस. दर्जाचे तिथले अधिकारी, ज्यांना ट्रेकिंगची माहिती असते ते हे वर्गिकरण करतात. ’कैलास’ चढाव लागतो. ’मानस’ला चालवं लागतं. नाबिडांग-कालापानी-गुंजी-बुधी.. असा तो प्रवास.. कैलासची परिक्रमा करताना दोन दिवसांत ६५ कि.मी. १९७५० फुट उंचीवर बर्फवृष्टी चालूच असते. आपण जणू निसर्गाचाच एक भाग होऊन उरतो.. कैलासचं दर्शन ही मोठी मुश्किल गोष्ट असते.
’मानस’ची १०० कि.मी.ची परिक्रमा आहे. दोन दिवसात पूर्ण होते. २००० सालापासून मात्र आता ही जीपने करता येते. एकूण बेसकॅंप टू बेसकॅंप ४०० कि.मी. च्या पुढे चाल होते.
’बडा कैलास’ चा अनुभव सांगा ना!
हा कैलास मानसचा माझा अनुभव चित्तथरारक आहे. १९९८ मध्ये मी गेलो होतो. आम्ही परतताना मालपाकडे कूच करणार तो आदेश आला की, मालपाला दरड कोसळली आणि ३११ जणांचा मृत्यू ओढवला आहे. येणाऱ्या लोकांचा ग्रुप त्यामध्ये होता. ’बुधी’पर्यंत आलेले आम्ही परत गुंजीला नेण्यात आलं. ८ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट आम्ही तिथेच अडकून होतो. अक्षरश: जवळच अन्न कमी होत होतं. अखेरीस एक कप चहावर राहायची वेळ आली. जोडीला प्रचंड अस्थिरता आणि काळजी. घरच्यांची काय हालत झाली असेल, विचारही करवेना. विदेश मंत्रालयाला जेव्हा ही हकिगत कळली तेव्हा युद्धात वापरली जाणारी दोन हेलीकॉप्टर्स त्यांनी पाठवली अणि आमची कशीबशी सुटका झाली. घरच्यांची पुनर्भेट हा काय अनुभव होता सांगू!
ह्या अनुभवानंतर ट्रेकिंग सोडून घरी बसावं वाटलं?
कशाला? पंचकेदार केलं ना! केदारनाथ, मदमहेश्वर, तुंगनाथ, रुद्रनाथ आणि कल्पेश्वर. पाचही शंकराची ठिकाणं हा ट्रेक कामालीचा कठीण. घोडा नाही, वाहन नाही, वैद्यकिय सुविधाही जवळ जवळ नाहीत. स्वत:च्या रिस्कवर निसर्गात जोकून द्यायचं.. मोठा सुंदर अनुभव. दिडशे कि.मी. एकूण चाल होते.
अप्पा, तुमची आतापर्यंत चाल किती हो?
साधारणपणे दीडहजार ते दोन हजार कि.मी.
तुमची चाल अखंड चालू राहो आणि आम्हाला अधिकाधिक संकटहीन अनुभव वाचायला-ऐकायला मिळोत ही इच्छा! ’वेबमाझा’ तर्फे शुभेच्छा नि धन्यवाद!
छे! छे! नुसते औपचारिक धन्यवाद नकोत. तरुण पिढीने गिरीकंदरांची हाक ऐकावी अशी माझी हाक आहे. तिला प्रतिसाद मिळेल तर तो आभारांपलिकडचा ठरेल. नाही का?
निश्चितच!
- डॉ. अलका रानडे
alka@webmajha.com