मला भावलेला आईनस्टाईन
’मला आईनस्टाईन आवडतो..’ ही काही आटपाटनगरीची साठा-उत्तरी सफल संपूर्ण होणारी कहाणी नाही; तर ति निरंतर शोधयात्रा आहे...
रामकृष्ण परमहंसांच्या आत्मप्रत्ययी उद्गाराने - "होय, मी परमेश्वर पाहिलाय!... तुझ्या इतक्याच जवळून आणि तूही त्या शक्तिचा प्रत्यय घेऊ शकतोस!" - नरेंद्राचं (स्वामी विवेकानंद) अस्तित्वं उजळून निघालं अशीच स्वर्गिय अनुभूती मी माझ्या ’संदर्भ चौकटीत’ घेतली!
आइनस्टाईनचे आयुष्य म्हणजे अपूर्व महाकाव्य!
आधुनिक जर्मनीचा उदय, २ महायुद्धे व अणुयुग आणि झिओनिस्ट चळवळ या तिन्ही संदर्भात त्यांनी केलेलं कार्य इतकं मौलिक आहे की, त्यांनी भौतिक जगाबद्दलच्या आपल्या कल्पना बदलल्या नसत्या तरी जगाच्या इतिहासात त्या अजरामर ठरल्या असत्या.
आइनस्टाईनने अणुच्या अंतरंगापासून कृष्णविवरापर्यंत, विश्वाच्या उत्पत्तीपर्यंत प्रकाशाच्या स्वरुपापर्यंत आणि वस्तुमान-ऊर्जा अशा मुलभूत संकल्पनांपासून ते थेट ’अनाद्यनंत’ असा पैस-कालाविषयी जे क्रांतिकारी संशोधन केलं- तेही ’मनाच्या प्रयोगशाळेत’ - त्याच्या केवळ दर्शनाने आपण भारावून जातो.
एखाद्या संताने प्रकाश-समाधी घ्यावी, तशी आइनस्टाईनने प्रकाश-भक्ती केली! कृष्णिका प्रारण, प्रकाशविद्युत परिणाम, पदार्थाची विशिष्ट उष्णता आदि घटीतांचं स्पष्टीकरण देऊन त्याने पुंज- विज्ञानात मौलिक भर घातली. प्रकाशकणाचे अस्तित्व वेधणारा, त्याच्या ’उत्तेजित’ उत्सर्जनाची संकल्पना मांडणारा तो क्रांतदर्शी वैज्ञानिक ठरला!
त्याच्या व्यापक सापेक्षता सिद्धांताने अवकाश, काळ, वस्तुमान, ऊर्जा या गोष्टी परस्परसंबद्ध आहेत! हे सिद्ध केलं.
मर्त्य मानवावर अधिसत्ता गाजविणारा ’काळ’ - अनंत नाही; अवकाशही अमर्याद नाही, याचा साक्षात्कार घडविला!
e=mc2 हे तर २०व्या शतकाचं क्रातिकारी सूत्र ठरलं!
’रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’- अशा अटीतटीने आइनस्टाईनचा प्रवास एकाकी यात्रिकाप्रमाणे चालूच राहिला. जे एक जाणून घेतल्याने बाकी सारं जाणून घेता येतं किंवा पूर्णातून पूर्ण वजा केल्यावरही जे अवशिष्ट रहातं - अशा संपूर्ण पुर्णत्वाचा (एक सामायिक क्षेत्र-समिकरणे) त्याने निदिध्यास घेतला होता!
"ईश्वराचे मनोगत कूट आहे, पण कुटील नाही... या विश्वातील दिप्तीमंत सौंदर्य आपला वेध घेणाऱ्याची प्रतीक्षा करीत आहे. -- सत्याच्या साक्षात्कारी क्षणाइतकेच - उत्कट जिज्ञासेने आणि विजुगीषु मनोवृत्तीने सत्याचा निरंतर शोध घेत राहणंही मौलिक असतं...!
...इये मार्गीचा कापडी! महेश अजुनी!
- या मार्गाचा आद्यप्रवर्तकही अजून या न संपणाऱ्या मार्गावरचा पथिक आहे; तिथे माझी काय कथा?
सत्याच्या विविध छटा असतात, प्रत्येकजण आपापल्या परीने सत्याचा शोध घेतच असतो. आमचाही हा एक असाच प्रयोग नववर्षाच्या पहिल्या दिनी आम्ही सुरु करीत असलेला... कोणतंही क्षेत्रं, कोणताही विषय ’वेबमाझा’ ला वर्ज्य नाही.
मात्र जे लिहिलं जाईल, जे वाचलं जाईल, जो संवाद होईल, वादही-निर्विवाद होईल... या सर्व वाटचालीत प्रामाणिक प्रयत्न, अभ्यासपूर्णता, संशोधकाची दृष्टी या सर्व मुल्यांना जोपासण्याचा आमचा प्रयत्न राहिल हे नक्की!
- मंदार जोशी
mandar@webmajha.com


