Bookmark and Share

WebMajha.com

संपादकीय ’वेबमाझा’ टीम तर्फे सर्वांचं ह्या संकेतस्थळावर स्वागत!

नमस्कार मंडळी!! महाजालाच्या सहाय्याने आपण जगभरातलं स्थानीय अंतर एकमेकांसाठी कमी करीत आणलं. पण तेव्हाच मनाने एकमेकांपासून तसू तसू दूर जाऊ लागलो की काय असंही मनाच्या कोपऱ्यात कुठे तरी सर्वांनाच वाटू लागलं...

एकीकडे आपण त्यासाठी उत्तरंही आपापल्या परीने शोधू लागलोय. एका वेगाच्या, गतीच्या मागे लागून, मन, मानवी मुल्य, निष्ठा, तत्व ह्या साऱ्यांचा विसर तर आपल्याला ह्या माहितीच्या प्रक्षोपात पडत नाहीये ना? ह्या प्रश्नाला उत्तर शोधताना संवादाच्या माध्यमातूनच सारे मूळस्त्रोत पुन्हा हुडकून काढुया, सर्वांनी मिळुन जोपासूया... त्याची फार गरज आहे असं वाटलं आणि ’निर्विवाद वेब-संवाद’ हे ब्रीद घेऊन ई-जगतात ठामपणे पाऊल टाकायचं ’टीम वेबमाझा’ने ठरवलं.

आपल्या ह्या संवादात साहित्य, विज्ञान, राजकारण, समाजकारण ह्यापैकी कोणत्याच ’एखाद्या’ विषयाचं बंधन नाही. मानवी मुल्य तपासून घ्यायची, पारखून घ्यायची. उगीच जमलेली कंसेप्ट-जळमट झटकून टाकून नव्या स्वरुपात त्यांचा अवलंब करायची गरज तीव्रतेने निर्माण झालेली असताना ’विचार’ हा सर्वच पातळींवर व्ह्यायला हवाय. सर्वांनीच संवाद साधायला हवाय. आणि त्यातून कृतीशील व्हायला हवंय. ह्यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही.

तेव्हा, आम्ही नि:संदिग्धपणे आणि पारदर्शक रितीने पोहोचवलेला संवाद हेतु लक्षात घेऊन आपण आम्हाला सहकार्य कराल अशी खात्रीयुक्त अपेक्षा आहे.

२०१० मध्ये प्रवेश करताना आपण सर्वांनी काय काय गमावलयं, काय मिळवलयं, काय करायला हवयं ह्यांची विषयविशिष्ठ सिंहावलोकन दरवर्षी प्रमाणेच तूर्त सगळीकढे चालू आहे. राजकीय, सामाजिक, अगदी कौ्टुंबिक व्यक्तिगत पातळीवर सुद्धा! काय गमावलयं ह्यांचं दु:ख करीत न बसता सर्वच पातळीवर काय मिळवायचयं ह्याचा सगळे मिळुन विचार करुया. संवाद साधूया-पुढे जाऊया.

’जगावेगळं’ काही करुन दाखविण्याच्या वल्गनाही आम्हाला करायच्या नाहीत. पाय पुर्णपणे जमिनीवर ठेऊन सर्वांनी मिळुन कोणकोणत्या दिशेने झेप घेता येईल त्याचा अदमास घ्यायचाय. नुसता अंदाज घेता थांबायचं नाहीये. सर्वांनी मिळुन महाजाळाच्या वेगाचं भान राखून त्यात पावलं गुरफटत नाहीत ना ह्याचा वेध घ्यायचाय.

वेग कायम रखायचाय...!